भुसावळात 80 हजारांचा गुटखा जप्त : दोघांना अटक
भुसावळ : शहरातील दोघांच्या ताब्यातून 80 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेसह भुसावळ पोलिसांनी केली. गिरीष वासुदेव दर्डा (भुसावळ) वपंकज गोपाळदास रोहेडा (रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रेल्वे जंक्शनवरील केला साईडींगजवळील टू व्हीलर पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शांताराम महाजन यांना कारवाईच्या सूचना केल्या. पोलिस कर्मचारी संकेत झांबरे, एलसीबीचे कर्मचारी भूषण चौधरी, श्रीकृष्ण देशमुख, रणजीत जाधव यांनी दोघा संशयीतांना अटक केली. संशयीतांकडे असलेल्या अॅक्टीवा (एम.एच.19 डी.ई.1093) मधून 79 हजार 569 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. शहर पोलिस ठाण्यात संकेत झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त केलेला गुटख्याचा माल हा मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथून रात्री आला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तपास शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.


