अटकेची टांगती तलवार : आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज


कणकवली : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता असून यासाठी पोलिसांकडून गोवा ते मुंबई मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याची चर्चा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अ‍ॅड.राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे.

उद्या होणार जामिनावर सुनावणी
या अटकपूर्व जामिनावरील पहिली सुनावणी 27 डिसेंबरला होणार होती. याबाबत मंगळवार, 28 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अ‍ॅड.रावराणे यांनी दिली.आयपीसी 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की त्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार हे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे.



शिवसैनिकावर झाला होता हल्ला
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसर्‍यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत. पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते मात्र नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला नितेश राणे यांनी हजेरी लावल्यास मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, असाही कयास बांधला जात आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नितेश राणे दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथूनही अटकेची तयारी केल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य : संजय राऊत
संजय राऊत यांनी नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीवर मुंबईत सारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाविषयी अधिक माहिती नाही. ही कायदेशीर बाब आहे. मी बोलणे बरोबर नाही. तेथील दोन पालकमंत्री आहेत, ते बोलतील. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कोणी काही गुन्हा केला तर कायद्याने कारवाई होते. पण माझ्याकडे जास्त माहिती नसल्याने त्याविषयी बोलणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !