लुधियाना न्यायालयात बॉम्बस्फोट : मास्टरमाइंड जसविंदर सिंग मुलतानीला जर्मनीतून अटक


नवी दिल्ली : पंजाबमधील लुधियानातील न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी स्फोटाचा मास्टरमाइंड जसविंदर सिंग मुलतानी याला जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. मुलतानी आयएसआयच्या सूचनेनुसार काम करत होता. काही दिवसांपूर्वी लुधियाना न्यायालयाच्या आवारात भीषण स्फोट झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले होते.

जर्मनीतील यंत्रणेकडून चौक्शी
मिळालेल्या माहितीनुसार, जसविंदर सिंग मुलतानी लुधियाना आणि देशातील इतर शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संस्थेचा सक्रिय सदस्य आहे. सध्या जर्मनीतील यंत्रणा मुलतानीची चौकशी करत आहेत. लुधियाना बॉम्बस्फोटाची योजना पाक गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानस्थित गँगस्टर हरविंदर सिंग रिंदाने आखली होती. मुलतानची चौकशी करण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा लवकरच जर्मनीला जाऊ शकतात. पंजाब पोलिसांचा बडतर्फ हेड कॉन्स्टेबल गगनदीप सिंग याला लुधियाना बॉम्बस्फोटात ह्युमन बॉम्ब म्हणून वापरण्यात आले होते.









मुलतानीवर अनेक आरोप
मुलतानी दिल्ली आणि मुंबईतही बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. केंद्र सरकारच्या आवाहनावरुन त्याला जर्मनीत अटक करण्यात आली. खलिस्तान समर्थक असण्यासोबतच मुलतानीवर पंजाब सीमेवरुन शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी पाकिस्तानमार्गे भारतात केल्याचाही आरोप आहे.

रींदावर अनेक गुन्हे दाखल
रिंदा हा गँगस्टर आहे. पंजाबशिवाय महाराष्ट्र, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्येही तो वॉन्टेड आहे. त्याच्यावर 10 खून, 6 खुनाचे प्रयत्न आणि 7 दरोडे याशिवाय शस्त्र कायदा, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी असे 30 गुन्हे दाखल आहेत. 2017 मध्ये रींदा पोलिसांच्या हातून निसटला होता, त्यानंतर तो पाकिस्तानात गेल्याचे निष्पन्न झाले होते. जसविंदर सिंग मुलतानी हा पंजाबमधील होशियारपूर येथील मुकेरीयाचा रहिवासी आहे. 1976 ला जन्म झालेल्या मुलतानीला दोन भाऊ असून दोघेही जर्मनीत दुकान चालवतात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !