33 किलो गांजासह धुळ्यातील दोघे भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची नाकाबंदी दरम्यान कारवाई : टोळी जाळ्यात अडकण्याची शक्यता
भुसावळ : वाहनातून होणारी गांजा तस्करी बाजारपेठ पोलिसांनी गस्तीदरम्यान रोखत 33 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी धुळ्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपींनी रेल्वेतून हा गांजा आणला असून तो वाहनाद्वारे ते धुळे येथे नेत असल्याची माहिती आहे. आरोपींनी हा गांजा कुणाकडून खरेदी केला? खरेदीदार व पुरवठादार कोण? आदी बाबी तपासात निष्पन्न होणार आहेत. स्वीप्ट चालक विजय वसंत धीवरे (45, रा.धुळे) व नंदकिशोर हिरामण गवळी (28, रा.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
गस्तीदरम्यान पोलिसांची कारवाई
गुरुवारी मध्यरात्री बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार लतीफ शेख, कॉन्स्टेबल प्रणय पवार हे रेल्वे स्टेशन परीसरात नाकाबंदी करीत असताना मध्यरात्री 2.25 वाजेच्या सुमारास मारोती स्वीप्ट (एम.एच. 01 बी.टी.6682) हिची तपासणी केली असता वाहनातील दोघांची हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने वाहनाची डिक्की उघडली असता त्यात प्लॅस्टीक बॅग उघडल्यानंतर त्यात गांजा आढळल्याने वाहनासह दोघांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी विजय वसंत धीवरे (45) व नंदकिशोर हिरामण गवळी (28) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गांजाची मोजणी केल्यानंतर तो 33 किलो आढळून आला. त्याचे बाजारमूल्य एक लाख 65 हजार असून पाच लाखांचे वाहन जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक भोये, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, पोलिस शिपाई प्रणय पवार, पोलिस हवालदार लतीफ शेख आदींनी केली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, नाईक किशोर महाजन करीत आहेत.


