चिंचोलीत चाकूहल्ला : परस्परविरोधात गुन्हे दाखल


जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथील तरूणावर किरकोळ वादावरून बसस्थानकाजवळ चाकूहल्ला झाल्याची घटना रविवार, 2 जानेवारी रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी सोमवार, 3 जानेवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन्ही गटाची पोलिसात तक्रार
नूतन मराठा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेणार्‍या निलेश दिलीप गडकर (21, रा.चिंचोली, जि.जळगाव) हा रविवार, 2 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घरी असताना गावातील गौरव सुनील शेळके याने फोन करून बोलून घेतले. त्यानुसार निलेश गावातील बसस्थानकाजवळ भेटायला गेला. त्यावेळी गौरव सोबत दिनेश शेळके, गोपाल ज्ञानेश्वर शेळके यांच्यासह चार ते पाच जण हातात बॅट, हॉकी स्टिक आणि चाकू घेऊन उभे होते. दरम्यान यातील गौरव म्हणाला की, तू 31 डिसेंबरच्या पार्टीला जास्त बोलत होता, असे म्हणत गौरवने त्याच्या हातातील चाकूने निलेशच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर इतरांनी बॅट व हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सोमवारी, 3 जानेवारी रोजी निलेश गडकर यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी गौरव सुनील शेळके, दिनेश शेळके, गोपाल ज्ञानेश्वर शेळके (सर्व रा.चिंचोली, ता.जळगावत्र यांच्यासह 4 ते 5 जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गफुर तडवी करीत आहे.





दुसर्‍या गटाचीही तक्रार
गौरव सुनील शेळके (20, चिंचोली, ता.जि.जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निलेश दिलीप गडकर याने 31 डिसेंबर रोजी शिविगाळ केली होती. याचा जाब विचारण्यासाठी गौरव हा 2 जानेवारी रोजी गावातील बसस्थानकाजवळ आला असता निलेश गडकरने लोखंडी रॉडने डोक्यात घाव घातले तर त्याचा भाऊ सागर दिलीप गडकर आणि विनोद गडकर यांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिघांनी दगड गौरव शेळकेच्या अंगावर मारले. यात गौरव हा जखमी झाला होता. त्याला जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सोमवार, 3 जानेवारी रोजी गौरव शेळके यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी निलेश दिलीप गडकर, सागर दिलीप गडकर आणि विनोद गडकर (तिघे रा.चिंचोली, ता.जि.जळगाव) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सचिन पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !