नशिराबादच्या 21 वर्षीय तरुणीची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील 21 वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समीना बानो शेख अफसर (21, रा.नशिराबाद, ता.जि.जळगाव) असे मयत तरूणीचे नाव आहे.
गळफास घेत केली आत्महत्या
समीना बानो ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. सोमवार, 3 जानेवारी रोजी तरुणीने राहत्या घरात कुणीही नसतांना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घरातील सदस्य घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांसह शेजारच्यांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.




