जळगावात तीन घरे फोडली : लाखो रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला
जळगाव : शहरातील ममुराबाद रोडवरील उस्मानिया पार्क भागातील अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडत सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि टॅबसह मुद्देमाल लांबवला. हा प्रकार सोमवार, 10 जानेवारी रोजी उघडकीस आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाच वेळी तीन घरे फोडली
ममुराबाद रोडवरील उस्मानियाँ पार्क भागात रविवार, 9 जानेवारी मध्यरात्री सलग तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आला. फिरोज मोहम्मद रफिक बागवान (उस्मानिया पार्क) यांच्या घराच्या मागच्या घराचा दरवाजा तोडत चोरट्यांनी लोखंडी कपाट तोडून घरातील तोळ्याच्या दोन सोन्याचे पोत, 10 हजार रूपये रोख आणि पैशांचा गल्ला चोरून नेला, त्यांच्या घराच्या बाजूला मोहम्मद जुबेर शेख रफिक यांचे कादरीया ट्रेडर्स या दुकानात कोल्ड्रींक्सचे होलसेल दुकान आहे. या ठिकाणी देखील अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत एक लॅपटॉप, मोबाईल टॅबलेट आणि 80 हजार रुपयांची रोकड लांबवली तसेच शेजारीच राहणार्या नावेद अहमद शेख नाशिर (34) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील आठ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, दोन सोन्याच्या अंगठ्या, अर्धाकिलो चांदीचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली.




पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी
जळगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर, हवालदार विजय निकुंभ, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. चोरी झाल्याचा पंचनामा करण्यात आला.
