खून प्रकरणातील संशयीतांकडून आपल्या जिवाला धोका : मीनाबाई जगताप यांचा आरोप


जळगाव : जिल्हा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या मारहाणीत माझे पती चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांचा 11 सप्टेंबर 2020 रोजी मृत्यू झाला आहे, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने संबंधित 5 आरोपींवर दीड महिन्यांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी अधिकारी आणि कर्मचारी पसार आहेत. हे आरोपी आता फिर्यादी , साक्षीदारांवर दबाव टाकून धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप चिन्या जगताप यांच्या विधवा पत्नी मीनाबाई जगताप यांनी रविवारी पत्रकार परीषदेत केला.

आरोपी पसार असताना कारवाई का नाही ?
आपली भूमिका समाजापुढे मांडण्यासाठी आणि न्याय मिळावा म्हणून आज पत्रपरीषदेत मीनाबाई जगताप म्हणाल्या की , उच्च न्यायालयाच्या आदेशाने संबंधित आरोपींवर दीड महिन्यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झालेला असला तरी तत्पूर्वी पोलीस काहीच दखल घेत नसल्याने मला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती त्यानंतर तब्बल 14 महिन्यांनी हा खुनाचा गुन्हा नशिराबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल झाल्यापासून हे पाच संशयीत आरोपी पसार आहेत, असे पोलीस सांगत आहेत. सर्व आरोपी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत . कामावर हजर नाहीत. तथापि कारागृह प्रशासनाकडून त्यांच्यावर निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई झालेली नाही. जिल्हा पोलिसांना संशयीत अद्याप गवसलेले नाही. एव्हढा प्रदीर्घ काळ त्यांचे पसार असणे आता जिल्हा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे . नेमके कोण त्यांना पाठीशी घालून संरक्षण देत आहे , हे सत्य समोर येणारच नाही का ? , असेही त्या म्हणाल्या.





जबाब नोंदविण्यास जळगावात येण्यास नकार : साक्षीदारांच्या जिवाला धोका
मीनाबाई जगताप पुढे म्हणाल्या की , हे 5 आरोपी जळगाव परिसरातील काही लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांचे स्थानिक प्रशासनात परीचय, संबंध असू शकतात. या पार्श्वभूमीवर चिन्या जगताप हत्याकांडातील साक्षीदार व सध्या नाशिकच्या किशोर सुधारालयात कारागृह शिपाई या पदावर कार्यरत असलेले मनोज जाधव यांनी जबाब नोंदविण्यास जळगावात येण्यास नकार दिल्याने किशोर सुधारालयाच्या प्राचार्यांनी तशी माहिती देणारे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पाठवले आहे. या हत्याकांडातील संशयीत आरोपी असलेले अधिकारी आणि कर्मचारी दीड महिन्यांपासून पसार आहेत. आपल्या जीविताला येथे आल्यावर धोका होऊ शकतो, अशी भीती साक्षीदार मनोज जाधव यांनी त्यांच्या वरीष्ठांकडे व्यक्त केली आहे. काही पोलिस कर्मचार्‍यांमार्फत मला पण धमकावण्याचा प्रयत्न हे आरोपी करत आहेत, असा आरोपही मीनाबाई जगताप यांनी केला.

मीनाबाई जगताप यांना रीरपाइं (आठवले गट) चा पाठिंबा
फिर्यादी आणि चिन्या जगताप यांची विधवा पत्नी मीनाबाई जगताप यांचा एकाकी संघर्ष चालू आहे. या निराधार विधवा महिलेला कुणाची साथ नाही, पोलिस खात्याने आता त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, हे संशयीत आरोपी कितीही पोहचलेले असले तरी कायद्याने त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सांगत आज या पत्रपरिषदेत मीनाबाई जगताप यांच्या संघर्षात आम्ही सोबत आहोत, अशा शब्दात रीपाइं (आठवले गट) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पाठिंबा जाहीर केला. या आरोपींना अटक न झाल्यास प्रसंगी रीपाइं (आठवले गट) मयताची पत्नी मीनाबाई यांच्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी आज दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !