पाचोरा तालुक्यात कार-दुचाकीत अपघात : दोघे गंभीर जखमी
पाचोरा : तालुक्यातील वरखेडी ते आंबे वडगाव गावा दरम्यान मारुती सुझुकी इको कार व मोटरसायकलची जोरदार धडक होवून यात मोटरसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
सोयगाव (जि.औरंगाबाद) नारळीबाग येथील रहिवासी आशा स्वयंसेविका सविता सुनील काकडे (35) व विष्णू शालिक राजनकर (29, रा.सोयगाव, औरंगाबाद) हे दोघे बचतगटाचे पैसे भरण्यासाठी दुचाकी (क्रमांक एम.एच.20 एफ.झेड.5937) ने पाचोरा येथे गेले असता सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वरखेडी ते आंबेवडगाव दरम्यान वरखेडी येथून जवळच असलेल्या हाजी इस्माईल भैय्या यांच्या ऑईल मिलजवळ पहुरकडुन भरधाव येणार्या मारुती सुझुकी इको (क्रंमांक एम.एच. 02 सी.झेड. 8399) ने मोटरसायकला जोरदार धडक दिली. या अपघातात सविता काकडे व विष्णू राजनकर हे गंभीर जखमी झाले. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.




जखमींवर पाचोरा येथे उपचार
अपघात घडताच जोरदार आवाज आल्यामुळे याच रस्त्याजवळ शेतात काम करत असलेले वरखेडी ग्रामपंचायत सदस्य योगेश चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित रुग्णवाहिका बोलावत जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मारुती सुझुकी ईको गाडी चालक परशुराम पाटील (रा.राजुरी, ता.पाचोरा) हा अपघाताच्या ठिकाणी न थांबता सरळ पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला हजर झाल्याचे सांगण्यात आले.
