भाजपचे आमदार सुरेश भोळेंसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल
कोरोना नियमांचे उल्लंघण केल्याचा ठपका : टॉवर चौकात भाजपाने केले होते आंदोलन
जळगाव : शहरातील टॉवर चौकात भाजपाने जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघण करून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह भाजपाच्या दहा पदाधिकार्यांविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजपाने केले होते आंदोलन
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी बुधवार, 19 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता बळीराम पेठ येथील भाजपा कार्यालयापासून ते टॉवर चौकात मोर्चा काढला. त्यानंतर टॉवर चौकात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक बॅनर जाळून आंदोलन केले होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
कोरोना काळात जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघण व आंदोलन करण्याची कोणतीही परवानगी नसतांना आंदोलन केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून रात्री 9 वाजता शहर पोलिस ठाण्यात आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक प्रभाकर सुर्यवंशी, सचिन पवार, राजेश भावसार, लालंद पाटील, तुकाराम निकम, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.
