जळगावात धूम स्टाईल महिलेची सोन्याची मंगलपोत लांबवली
जळगाव : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 40 हजार रूपये किंमतीची मंगलपोत तोडून अज्ञात चोरट्यांनी लांबवत पोबारा केला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील रींग रोड परीसरात सायंकाळी ही घटना घडली.
शहरात वाढल्या चोर्या
रींग रोड परीसरातील हरेश्वर नगरात निशा सुरेंद्र काबरा (49) ह्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती सुरेंद्र गणपत काबरा हे जिल्हा न्यायालयात सरकारी वकील म्हणून नोकरीला असून गुरूवार, 20 जानेवारी रोजी सायंकाळी निशा काबरा ह्या पती अॅड.सुरेंद्र काबरा यांच्यासोबत आकाशवाणी चौकातील श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास दर्शन घेऊन पायी घराकडे परतत असताना त्यांच्या मागून आलेल्या एकाने निशा काबरा यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅमचे मंगळसूत्र लांबविले. त्यानंतर संबंधित व्यक्ती आकाशवाणी चौक परीसरातील अग्रवाल हॉस्पिटलच्या मागे पळून गेला. याप्रकरणी निशा काबरा यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेकर हे करीत आहेत.





