बंद घर फोडत दोन लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
जळगाव : शहरातील डी.एन.कॉलेजजवळील दत्त नगरात मध्यरात्री बंद घरातून सोने व चांदीच्या दागिने, रोकडसह लॅपटॉप व मोबाईल मिळून एक लाख 91 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोर्या, घरफोड्या वाढल्या
सविता यतीन पाटील (30, रा.सुनंदीन पार्क, दत्त नगर, डी.एन.कॉलेज, जळगाव) या कुटुंबियांसह वास्तव्याला असून शनिवार, 22 जानेवारी त्या कुटुंबियांसह कामानिमित घर बंद करून बाहेरगावी गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडले. घराच्या वरच्या मजल्यावर जावून दरवाजाची आतील कडी आरशात पाहून उघडली. घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, 15 हजारांची रोकड, मोबाईल आणि लॅपटॉप असा एकूण एक लाख 91 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. हा प्रकार 24 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता उघडकीला आला.





शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल
सविता पाटील या घरी आल्यानंतर चोरट्यांनी चोरी केल्याचे उघड झाले. त्यांनी शनीपेठ पोलिसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.
