चोरटे शिरजोर : बंद घरातून लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
जामनेर : बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत एक लाखांचा मुद्देमाल लांबवला. शहरातील माळी गल्लीत बंद असलेल्या घरात झालेल्या चोरीने खळबळ उडाली आहे.
बंद घर चोरट्यांना संधी
शहरातील माळी गल्लीत विनोद लोढा हे मोहन भवनात वास्तव्यास आहेत. दरम्यान लोढा हे परीवारासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता चोरट्याने बंद घरांचे कुलूप तोडून घरातील लाखांचा ऐवज लंपास केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, पोललि उपनिरीक्षक दिलीप राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व हॅपी स्वान पथकाद्वारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप परदेशी, मनोज पाटील यांनी तपासणी केली असता चोरट्यांनी चोरी करून घराबाहेर काही अंतरावर जाऊन चारचाकी वाहनाने पळ काढल्याचे स्पष्ट झाले आहे.





घर मालक आल्यानंतर कळणार चोरी गेलेल्या मुद्देमालाचा अंदाज
घर मालक कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. यामुळे किती ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झालेले नाही. तत्पूर्वी गेल्या तीन दिवसांपूर्वीच शहरातील रस्त्यावर असलेल्या आयडीबीआय बँक एटीएम फोडून चोरट्यांनी बारा लाख रुपये चोरी केले होते. तीन दिवसात दुसरी घटना घडल्यामुळे चोरट्याचे मनोबल वाढले असून मात्र दुसरीकडे शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शहरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरीकांकडून होत आहे.
