जळगावात बंद घरातून 60 हजारांचा ऐवज लंपास
जळगाव : जळगावात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
शहरातील आदर्श नगरातील रहिवासी वैभव मनोहरराव ठोसर (35) हे पत्नी व मुलीसह वास्तव्यास आहे. वैभव ठोसर यांना सुट्टी असल्याने शुक्रवार, 28 रोजी रात्री 12.30 वाजता ते पत्नीला अमरावती येथे माहेरी सोडवण्यासाठी गेले होते. दरम्यान घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत घरातील गोदरेजच्या कपाटात ठेवलेले सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वैव ठोसर यांच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





चोरीमुळे उडाली खळबळ
वैभव ठोसर हे पत्नीला माहेरी पोहचविल्यानंतर 29 रोजी सकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घरी परतले. यावेळी त्यांनी दरवाजाचे कुलूप उघडण्यासाठी ते गेले असता, दरवाजाला कुलूप नसून कडी कोयंडा तुटलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना बेडरुममधील गोदरेजचे कपाट उघडे दिसले. चोरट्यांनी ठोसर यांच्या घरातील गोदरेजच्या कपाटात ठेवलेले 5 हजार रुपयांचे 2 भार वजनाचे तोरड्या, 5 हजारांचे 2 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 20 हजार रुपयांची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 30 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 60 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
