वधू पित्याच्या घरातून 90 हजारांचे दागिने लंपास
चाळीसगाव : तालुक्यातील लहान बोढरे येथे मुलीच्या लग्नासाठी आलेल्या दाम्पत्याच्या घरातील एका बॅगेतून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह एकूण 90 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
चाळीसगाव तालुक्यातील लहान बोढरे येथील विजय पोपट सोनार हे गवंडीच्या कामानिमित्त विरार मुंबई येथे रहायला आहे. दरम्यान मुलीचा लग्न असल्याने सोनार हे आपल्या कुटुंबासह घरी आलेले होते. लग्नाच्या दिवशी घरात एका बॅगेत 50 हजार किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याची चैन, 24 हजार 750 रूपये किंमतीच्या 5 ग्रॅम सोन्याची अंगठी व 18 हजार रुपये किंमतीच्या साड्या असे एकूण 92 हजार 750 रूपये किंमतीचा ऐवज ठेवला होता मात्र चोरट्यांनी तो चोरून नेल्याची घटना 27 जानेवारी रोजी रात्री 8.30 ते 9 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजय पोपट सोनार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.





