बोदवडच्या तरुणाचा मृतदेह आढळला
घातपात झाल्याचा नातेवाईकांना संशय : पोलिसांकडून तपासाला वेग
जामनेर : बोदवड शहरातील 20 वर्षीय तरुणाचा जामनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या बोदवड रस्त्यावरील पुलाखाली सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला की घातपात त्याचा मृत्यू झाला? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र नातेवाईकांनी घातपाताची भीती व्यक्त केली आहे.
पुलाखाली सापडला मृतदेह
जामनेर-बोदवड रस्त्यावरील पुलाच्या खाली एका अनोळखी मुलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून मृतदेह जामनेर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.निकम यांनी तरुणाला मयत घोषीत केले.
मयत तरुण बोदवडचा रहिवासी
पोलिस तपासात मयत हा शुभम नंदू माळी (20, रा.दत्तनगर, बोदवड) असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच शुभमची आई व नातेवाईकांनी धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. शुभमचा घातपात झाल्याचा संशय आई व नातेवाईकांनी केला आहे. शुभम नंदू माळी हा तरुण बदलीवर पालेभाज्या घेऊन जाणार्या चार चाकी वाहनावर जात होता. अशी माहिती नातेवाईकांनी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकम यांनी दिलेल्या खबरीवरून जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत सखोल तपास सुरू आहे.


