आसोद्याच्या ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबल्याने मृत्यू


जळगाव : ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चाकाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना आसोदा रेल्वेगेटजवळ बुधवारी दुपारी घडली. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. विठ्ठल यशवंत रायसिंग (कोळी, 45, रा.आसोदा, ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे

आसोदा गेटवर दुर्घटना
विठ्ठल कोळी हे ट्रॅक्टर चालक असून ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. बुधवार 2 फेब्रुवारी रोजी विठ्ठल कोळी हे जळगावहून आसोदाकडे रिकामे ट्रॅक्टर घेवून जात होते. त्यावेळी आसोदा रेल्वे गेट बंद होते. ट्रॅक्टर थांबवून रेल्वे जाण्याची वाट बघत असतांना ट्रॅक्टरचा अचानक ब्रेक फेल झाल्याने त्यांचा ट्रक्टरवरील ताबा सुटला व ते खाली पडले. तेवढ्यात ट्रक्टरचे चाक अंगावरून गेल्याने ट्रॅक्टर चालक विठ्ठल कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय विद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी सरला, बबलू आणि जयवंत हे दोन मुले आणि विवाहित मुलगी दीपाली, सुन असा परीवार आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !