तरुणाला मारहाण करीत सोन्याचे दागिने व रोकड जबरीने लुटली
पाचोरा : “तुला कधीचा शोधत होतो” असे सांगून तरूणाला कारमधून आलेल्या अनोळखी दोन जणांनी बेदम मारहाण करून सोन्याचे दागिने व रोकड जबरी लांबविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्ता अडवत केली लूट
धरमसिंग विजयसिंग राजपूत (३८, रा. पळासी, ता.सोयगाव, जि.जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते कटलरी दुकान चालवून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास धरमसिंग राजपूत हे त्यांच्या मुलासह दुचाकीने पाचोरा येथून वरखेडीमार्गे सोयगाव येथे जात असतांना रस्त्यावरील लोहारी बु॥ गावाजील इंदीर नगर जवळून जात असतांना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या कारने धरमसिंग राजपूत यांचा रस्ता आडविला. कारमधून दोघे खाली उतरवून त्यातील एक म्हणाली की, “तुला कधीचा शोधत होतो.” असे बोलून त्यांच्या दुचाकीला लाथ मारली आणि दुचाकीच्या हॅण्डलला लावलेली रोकड आणि दागिने ठेवलेली पिशवी जबरी हिसकावून लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी धरमसिंग राजपूत यांनी पिंपळगाव हरेश्वर येथे धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये करीत आहे.





