अधिकारी होण्याचे स्वप्न निश्चित पहा मात्र अपयशाने खचून जावू नका
प्रांताधिकारी बबनराव काकडे : रावेरात स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने विषयावर व्याख्यान
रावेर : युवकांनी स्पर्धा परीक्षा देतांना आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न नक्कीच पहावे परंतु अपयश आल्यास खचून न जाता प्लान ‘बी’ सुध्दा तयार ठेवावा. आताच्या युगात नोकरी मिळविणे सोपे राहिलेले नाही त्यामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. युवकांनी यशस्वी होण्यासाठी व्यवसाय, उद्योग क्षेत्राकडेही आपले लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे स्पष्ट प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी व्यक्त केले. रंगपंचमी व्याख्यानमालेत ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने’ विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.
रंगपंचमी व्याख्यानमालेला सुरुवात
रावेर शहरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये रंगपंचमी व्याख्यानमालेला नुकतीच सुरूवात झाली. पहिले पुष्प सटाणाा प्रांतधिकारी बबनराव काकडे यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर गुंफले. काकडे पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आताच्या स्पर्धा परीक्षामध्ये 1100 ते 1200 विद्यार्थी सिलेक्ट झाल्यास त्यांच्यापैकी एकालाच एमपीएससी किंवा यूपीएससी किंवा इतर शासकीय नोकरी मिळते बाकीचे मुले निराश होतात नैराश्यात जातात तर काही विद्यार्थी आत्महत्या करण्याच्यादेखील बातम्या येतात त्यामुळे स्पर्धा परीक्षेवर अवलंबून न राहता ‘प्लान बी’ देखील तयार ठेवा. युवक युवतींनी स्पर्धा परीक्षा देतांना अभ्यासात संपूर्ण लक्ष केंद्रीत करावे मगच परीक्षा द्यावी अन्यथा देऊ नये, असे स्पष्टपणे बबनराव काकडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, सलग दोन राज्य सेवांच्या पूर्व परीक्षेत मला अपयश आले त्यामुळे खचून गेलो होतो परंतु सततच्या वाचनामुळे मी स्पर्धा परीक्षा उतीर्ण होऊ शकलो त्यामुळे पूर्ण जिद्दीने स्पर्धा परीक्षा द्यावी. यश आले तर फारच चांगले न आल्यास खचून न जाता व्यवसाय वा उद्योगाकडे वळावे, असेही ते म्हणाले.


यांची व्याख्यानमालेस उपस्थिती
रंगपंचमी व्याख्यानमालेला प्रमुख मान्यवर म्हणून प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक कैलास नागरे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अनिल महाजन, विठोबा पाटील, डॉ.राजेंद्र आठवले, दिलीप वैद्य आदी उपस्थित होते.
