जळगाव जिल्ह्यातील बेघरसह अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घरकुल !

रीपाई जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी : रीपाइंच्या आंदोलनाची जिल्हाधिकार्‍यांकडून दखल


भुसावळ : अकलुद गावातील बेघर व अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकुल मिळण्यासाठी रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवार, 26 रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी बुधवार, 27 रोजी जिल्हा परीषदेसह पंचायत समिती व ग्रामपंचायतीला जळगाव जिल्ह्यातील जे लोक बेघर व अतिक्रणधारक आहेत त्यांची यादी बनवून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील बेघरांना व अतिक्रमण करून राहणार्‍या नागरीकांना घरकुल मिळण्याचा मार्ग सुकर झाला असल्याची माहिती रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परीषदेत दिली. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परीषदेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून अशा लोकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरून आलेल्या प्रस्तावानंतर घरकूल मंजूर करण्यासह अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत लवकरच आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी प्रसंगी सांगितले.

हक्काचे मिळणार घरकूल
यावलसह रावेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात अतिक्रमणधारकांना व बेघर असलेल्या लोकांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत हक्काचे घर देण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित प्रशासनाला प्रस्ताव पाठवण्याचे सूचित केले आहे. रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी अतिक्रमणधारकांना व बेघर असलेल्या लोकांना हक्काचे घर मिळावे याकरीता जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कार्यकर्त्यांनी या योजनेचा लाभ गरजू लोकांना मिळवून देण्याचे आवाहन राजू सूर्यवंशी यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !