कर्ज डोईजड झाल्याने पिस्तुलाच्या धाकावर कापसाचा ट्रक लुटला : चौघे आरोपी चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव : कर्ज डोईजड झाल्याने पिस्तुलाच्या धाकावर दहशत निर्माण करून कापसाचा ट्रक अडवत त्यातील सुमारे 15 क्विंटल कापूस लांबवत ट्रक चालकासह क्निनरचे अपहरण झाल्याची घटना कोदगाव चौफुलीजवळ मार्च 2019 मध्ये घडली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात चाळीसगाव शहर पोलिसांना यश आले आहे. चौघा आरोपींच्या चाळीसगाव शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
चौघा आरोपींना अटक
पप्पू उर्फ प्रशांत गोटीराम दशपुते (चिंचगव्हाण, ता.मालेगाव), गोकुळ संतोष पवार (दहिवाळ, ता.मालेगाव), हारुण इब्राहिम शेख (रा.चिंचगव्हाण, ता.मालेगाव) व दीपक सोनबावा (दहिवाळ, ता.मालेगाव) यांना अटक करण्यात आली असून अन्य तिघे संशयीत आरोपी पसार आहेत. शहर पोलिसांच्या शोध पथकातील पोलिस नाईक अभिमन पाटील, विजय शिंदे, विनोद भोई, प्रवीण सपकाळे, संदीप पाटील, दीपक पाटील, विनोद खैरनार, विजय पाटील, सतीश राजपुत आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड करीत आहेत.



कर्ज डोईजड झाल्याने ट्रक लुटला
ट्रक चालक भगवान दगडूबा गव्हाड हे 18 मार्च 2019 रोजी ट्रक (क्र.एम.एच 20 ई.जी. 7135) मध्ये 15 टन कापूस भरून आंबेलहोळ गावाकडे जात असताना कोदगाव चौफुलीजवळ दोन पांढर्या रंगाच्या वाहनातून आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी गतिरोधकाजवळ ट्रक अडवत पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्यासह क्निनरला आपल्यासोबत वाहनात बसवले. त्यांच्या जवळील 20 हजार रुपये हिसकावून घेत रात्रभर रस्त्यावर इकडे-तिकडे फिरवून सकाळी पुन्हा मालेगाव-धुळे रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रकजवळ सोडून दिले व या वेळेत ट्रकमधील कापूस अन्य ट्रकमध्ये उतरवून त्याची अहमदाबादमध्ये विक्री करण्यात आल्याची घटना घडली होती. आरोपींवर मोठ्या प्रमाणावर कर्ज झाल्याने त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील कार जप्त करण्यात आल्या असून आरोपींना पोलिस कोठडी मिळाल्यानंतर सुमारे आठ लाख 70 हजार रुपये किंमतीच्या विकलेल्या कापसाची रीकव्हरी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
