The governor Clearly Said: Order Me to Keep Quiet ! राज्यपाल स्पष्टच म्हणाले : मला चुप्पी साधण्याचे आदेश !
The governor Clearly Said: Order Me to Keep Quiet! नवी दिल्ली : मी बोलणार नाही. इथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला. मला बोलायचेच नाही. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत, असे धक्कादायक विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य करून अकारण वाद निर्माण करणारे राज्यपाल अलिकडेच चर्चेत आले होते. मराठी बांधवांविषयी त्यांनी काढलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोडही उठली होती मात्र रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत असताना त्यांच्याहस्ते ’हर घर तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्याकडे अक्षरश: पाठ फिरवत तेथून काढता पाय घेतला.
कोश्यारी म्हणाले मला न बोलण्याचे आदेश
मी बोलणार नाही. इथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला. मला बोलायचेच नाही. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत, असे धक्कादायक विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना करीत काढता पाय घेतला. कोश्यारी यांचे हे एकूण वक्तव्य पाहता भाजपश्रेष्ठींकडून त्यांना न बोलण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने त्यांना अशाप्रकारे बोलण्यास मनाई झाली असल्यास या प्रकारावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अलिकडेच केला वादग्रस्त विधान
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. गुजराथी आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे भाजपची पुरती कोंडी झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यापासून फारकत घेत हात झटकले होते. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे एकाकी पडले होते. त्यांनी स्पष्टीकरण देऊनही राज्यातील नागरीकांचा रोष कमी झाला नव्हता.
माफिनाम्यानंतर पडला पडदा
अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सपशेल माफी मागावी लागली होती. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो, असे राज्यपालांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले होते.
