दोघांवर चाकूहल्ला : तिघांना अटक
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कॉलेज चौकात वाद मिटवित असतांना दोन जणांना चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी गुरूवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी अटक करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघा आरोपींना अटक
दीपक उर्फ दप्तऱ्या संजय साळुंखे (23, रा. प्रजापती नगर, जळगाव), शैलेश उर्फ गोलू शंकर चौधरी (19, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) आणि गोलू भास्कर सोनार (23, रा.लक्ष्मी नगर, तांबापूर जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अशी घडली घटना
याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कॉलेज चौकावरील माऊली साई टी सेंटरजवळ सुशील मनोज जाधव (रा. सुधाकर नगर, जळगाव) व त्याचा मित्र राकेश गोपाल पाटील याच्यासोबत मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता उभे होते. त्यावेळी भरधाव दुचाकीने एका सायकलस्वाराला धडक दिली होती. यामुळे वाद निर्माण झाला होता. सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी राकेश पाटील, सुशील जाधव आणि बाजूला उभा असलेला बेकरीवाला सुरेश पाटील यांनी मध्यस्थी केली असतांना पाच जणांपैकी एकाने हातातील धारदार चाकू काढून राकेश पाटील यांच्या पोटावर तर बेकरीवाला सुमित पाटील यांच्या पाठीवर मारहाण करून दुखापत केले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, इम्रान सय्यद, किशोर पाटील, सचिन पाटील मुद्दस्सर काझी, छगन तायडे यांनी संशयित आरोपी दिपक उर्फ दप्तऱ्या संजय साळुंखे (२३, रा. प्रजापती नगर, जळगाव), शैलेश उर्फ गोलू शंकर चौधरी (१९, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) आणि गोलू भास्कर सोनार (२३, रा. लक्ष्मी नगर, तांबापूर, जळगाव) यांना अटक केली. तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.
