वरणगावातील अतिक्रमण निर्मूलनासाठी नगरपरीषदेने घेतला पुढाकार
वरणगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने वाहनधारक व पादचार्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वाढत्या तक्रारी पाहता नगरपरीषदेने पुढाकार घेवुन या मार्गावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिम हाती घेतली आहे.
वाहनधारकांना मोठा दिलासा
शहरातील महात्मा गांधी विद्यालय ते भोगावती नदी पात्रातील मुख्य मार्गावर व्यावसायीकांनी आपापल्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणावर ताडपत्री टाकुन अतिक्रमण केले होते. इतकेच नव्हेतर तलाठी कार्यालय सुद्धा अतिक्रमण धारकांनी आपल्या विळख्यात घेतले होते. यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करणारे वाहनधारक, पादचारी व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपरीषदेने शुक्रवारी पुढाकार घेऊन अतिक्रमण निर्मूलन मोहिम हाती घेतली. यामध्ये अतिक्रमण केलेल्या व्यावसायीकांच्या दुकानासमोरील ताडपत्री, फलक, टेबल व इतर साहित्य जप्त करण्यात आले तसेच अतिक्रमण करणार्या व्यावसायीकांना योग्य ती कारवाई करण्याची समज देण्यात आली. यामुळे शहरातील मुख्य मार्गाने मोकळा श्वास घेतला असून वाहनधारक व पादचारी व शालेय विद्यार्थ्यांना मार्गक्रमणासाठी दिलासा मिळाला आहे.

पथकात यांचा होता समावेश
नगर परीषदेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक पंकज सूर्यवंशी, गणेश कोळी, अनिल तायडे, दीपक भंगाळे, रींकु इंगळे, महेंद्र मोरे, लड्डा भोई, गंभीर कोळी यांच्यासह कर्मचारी सहभाग होते.
रात्रीतून केले जाते बांधकाम
बसस्थानक चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतच्या मुख्य मार्गावरील अतिक्रमित व्यावसायीक आपली पडकी दुकाने पाडून रात्रीतून पक्के बांधकाम करीत आहेत तसेच या मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रामपेठच्या चौकापर्यंत दोन्ही बाजुने असलेली दुकाने नगरपरीषदेच्या जागेवर अतिक्रमित असून त्यांचीही निर्मूलन मोहिम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
