Dhadgaon Rape Murder Case 6 Police Transfer धडगावातील तरुणीवर बलात्कार प्रकरणात तपासात दिरंगाई : पोलीस निरीक्षकांसह सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या


Dhadgaon Rape Murder Case 6 Police Transfer नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात आदिवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांसह सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तरुणीची बलात्कार करून हत्या
धडगाव तालुक्यातील खडक्या येथे १ ऑगस्ट रोजी एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. या तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. तरीदेखील पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केली होती. यानंतर न्यायाच्या मागणीसाठी वडिलांनी मृतदेह दीड महिना मीठाच्या खड्डय़ात पुरून ठेवला. हे प्रकरण माध्यमांनी समोर आणल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवून कुटुंबीयांच्या मागणीनुसार पुन्हा शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आणला. अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल प्रलंबित आहे. अखेर दीड महिन्यानंतर कुटुंबीयांनी आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

पोलिसांकडून दिरंगाई
पोलिसांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यानंतर धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांचा कार्यभार आय. एन. पठाण यांनी स्वीकारला आहे. तसेच उपनिरीक्षक बी. के. महाजन यांचीही नियंत्रण कक्षात आणि खडक्या, वावी क्षेत्र सांभाळणारे संजय मनोरे, किरण वळवी, उदेसिंग ठाकरे, योगेश निकम या पोलीस कर्मचाऱ्यांची इतर पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली आहे.

दोषींवर कठोर कारवाई व्हावी!
मुंबईहून खडक्या येथे परतलेल्या पीडितेच्या वडिलांनी तपासाबाबत समाधान व्यक्त केले असून दोषींना कठोर शिक्षा देऊन मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाच्या वेगवान तपासासाठी पोलीस महानिरीक्षकांनी नेमलेल्या विशेष तपास पथकाची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट घेतली असून तपासाला वेग आला आहे.


कॉपी करू नका.