रमजीपुरातील डायरीयाची साथ आटोक्यात
रावेर : तालुक्यातील रमजीपूर येथे गत आठपड्यापासून दूषित पाण्यामुळे डायरीयाची लागण होवून दोघांचा मृत्यू ओढवला होता तर सुमारे 89 ग्रामस्थांना डायरीयाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी दिवसभर गावात पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. संपूर्ण गावातील पाईप-लाईनची लिकेज दुरुस्ती करण्याच्या कामाला वेगात सुरूवात झाली. गावातील डायरीयाची साथ जवळपास आटोक्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोग्य पथक तळ ठोकून
रमजीपुर बुधवारीदेखील डायरीया आटोक्यात आणण्यासाठी साथरोग पथक रुग्णवाहिकेसह ठाण मांडून होते. रमजीपूरात डायरीयाची लागण झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथे 20 आरोग्य सेवक, 10 आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्या प्रयत्नाने सर्वेक्षण करून घरोघरी जाऊन औषधोपचार करण्यात आले तसेच अंगणवाडीत आरोग्य पथक ठाण मांडून सेवा देत आहे. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शिवराय पाटील, तालुका आरोग्य सहाय्यक रामभाऊ चौधरी, आरोग्य विस्तार अधिकारी सरफराज तडवी तसेच निंभोरा, वाघोड, लोहारा, ऐनपूर आरोग्य केंद्राचे कर्मचारी तळ ठोकून आहेत.



