शेततळ्यात अंघोळीसाठी उतरलेल्या चौघा मुलांचा शॉक लागल्याने मृत्यू
Four children who came down to bathe in the farm died due to shock अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील चौघा मुलांचा शेततळ्यात अंघोळीदरम्यान विद्युत शॉक लागल्याने मृत्यू ओढवला. निकेत अरुण बर्डै, ओंकार अरुण बर्डै, दर्शन अजित बर्डै व विराज अजित बर्डै अशी मयत चौघा भावंडांची नावं आहेत. दरम्यान, अचानक मुलांचे मृतदेह बघून आई- वडिलांनी एकच हंबरडा फोडला.
वीज वाहक तारा तुटून पडल्या शेततळ्यात
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परीसरातील वांदरकडा येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. बर्डे यांच्या वस्तीजवळच छोटेसे तळे आहे. त्या तळ्याच्या वरून वीज वाहक तारा गेलेल्या आहेत. तारा तुटून तळ्यात पडलेल्या होत्या. मात्र, मुलांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. ते सरळ पाण्यात गेल्याने त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर मृतदेह निघाले बाहेर
वीज कंपनीच्या कर्मचार्यांनी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, पावसामुळे रस्ता खराब झाला होता. त्यामुळे रुग्णवाहिका दूरवरच उभी करावी लागली. तिथपर्यंत झोळी करून मृतदेह न्यावे लागले. चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यूमुळे ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेला वीज कंपनीला जबाबदार धरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
