वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न लवकरच सोडवणार
शिष्टमंडळाला आश्वासन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
भुसावळ : महाराष्ट्रातील वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे अनेक महत्वपूर्ण विषयांवर तत्कालीन सरकारने पूर्णपणे निक्रीयता दाखविल्यामुळेच कामगारांचे प्रश्न प्रलंबितच राहिल्याने या प्रलंबित प्रश्नांबाबतीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासोबत लवकरच सविस्तर बैठक आयोजित करून निश्चितच कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या शिष्टमंडळाला नुकतेच मुंबईतील मंत्रालयात भेटीप्रसंगी दिले.
यांचा शिष्टमंडळात समावेश
या शिष्टमंडळात कोथरुड विधानसभेच्या माजी आमदार व राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई, संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ, उपमहामंत्री प्रशांत भांबुर्डेकर आदी उपस्थित होते.


कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी
संघटनेच्या वतीने कामगारांच्या महत्वपूर्ण मागण्यांबाबतीत सविस्तर निवेदन ऊर्जामंत्री यांना दिले आहे. इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कायम करावे याची सुरुवात वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांपासून करावी, असे निवेदनात नमूद आहे. यासाठी विशेष पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी यांनी संघटनेला दिल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन भावसान यांनी दिली.