मंत्री मंडळ विस्तारात दिव्यांग मंत्रालय आमदार बच्चू कडूंना द्यावे
यावल शहरातील दिव्यांग बांधवांची मागणी
यावल : शहरातील दिव्यांग पुनर्वसन संस्था तसेच नगरपालिका दिव्यांग कर्मचारी यांच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन पाठवत दिव्यांगांसाठी निर्माण करण्यात आलेल्या स्वतंत्र मंत्रालयाचा कारभार नव्याने विस्तारीत मंत्री मंडळातून आमदार बच्चू कडू यांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
यावल तालुक्यातील दिव्यांग पुनर्वसन संस्था तसेच दिव्यांग कर्मचारी नगरपालिका संघटना यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय की, महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा दिव्यांग बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे. तसेच आता राज्यातील मंत्री मंडळाचा खाते विस्तारदेखील आहे. मंत्री मंडळाचा विस्तार करतांना दिव्यांगासाठी निर्माण केलेल्या खात्याचे मंत्रीपद प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना देण्यात यावे कारण आतापर्यंत त्यांचे काम पाहता त्यांनी दिव्यांगांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम राबवले आहेत व सातत्यांने दिव्यांगाकरीता त्यांचे कार्य सुरू असते व त्यांना दिव्यांगांची जाण आहे व त्यांच्याकडे मंत्री पदाची जबाबदारी दिल्यास दिव्यांगांसाठी ते सक्षमरीत्या काम करतील, असा आशावादही व्यक्त करण्यात आला. निवेदनावर संस्थाध्यक्ष मोहन सोनार, जनार्दन फेगडे, विश्वनाथ बारी, विलास पाटील, सुभाष पाटील, शरद जिभे, पराग पवार, प्रकाश रावते, जितेंद्र घोडके, अनिल उंबरकर, अशोक भावसार, अश्विनी चौधरी, भगवान बारी, नदीम खान, पराग पवार, कुणाल फेगडेसह शहरातील 36 दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.

