चिमुकल्याचा हलगर्जीपणाने मृत्यू : भुसावळातील डॉ.खानापूरकर पिता-पूत्रांविरोधात गुन्हा
चौकशी समितीच्या अहवालानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसात दाखल झाला गुन्हा
Careless death of a child: A case against Dr. Khanapurkar father and son in Bhusawal भुसावळ : शहरातील प्रथितयश डॉक्टर खानापूरकर पिता-पूत्रांविरोधात नऊ महिन्यांच्या बालकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने भुसावळातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. नऊ महिन्यांच्या बाळावर उपचार करताना डॉक्टर पिता-पूत्रांनी हलगर्जीपणा केल्याने निष्पाप बाळाचा मृत्यू ओढवल्याची घटना सुमारे पाच वर्षांपूर्वी घडली होती. या संदर्भात वरीष्ठ स्तरावर तक्रारी करण्यात आल्या व त्याबाबत चौकशी झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
उपचारादरम्यान चिमुकल्याची मालवली प्राणज्योत
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील पाटीलमळा भागातील रहिवासी रंजना शैलेंद्र देशमुख (34) यांचा नऊ वर्षीय चिमुकला चेतायू यास प्रकृती अस्वास्थामुळे डॉ.खानापूरकर यांच्या रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर 31 ऑक्टोंबर 2017 ते 9 नोव्हेंबर 2017 दरम्यान डॉ.उमेश खानापूरकर व डॉ.समीर खानापूरकर यांनी उपचार केले मात्र चिमुकल्याचा त्यादरम्यान मृत्यू ओढवला.


डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू
डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप मृत चिमुकल्याच्या पालकांनी केल्यानंतर या संदर्भात आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. या संदर्भात चौकशी समितीने चौकशी केल्यानंतर त्याबाबत अहवाल दिल्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर रंजना देशमुख यांनी मंगळवारी रात्री तक्रार दिल्यानंतर डॉ.खानापूरकर पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने भुसावळातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.
