कुर्ह्यात भाजपा-सेना युतीची सत्ता आल्यास 50 लाखांचा निधी देणार
आमदार मंगेश चव्हाण : परीवर्तन पॅनलने निवडणुकीत तापवला आखाडा
कुर्हा : मुक्ताईनगर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कुर्हा येथे निवडणुकीसाठी आखाडा तापला असून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी बुधवारी झुणका भाकर केंद्रसमोर ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी सभा घेतली. भाजपा-सेना युतीच्या परीवर्तन पॅनलच्या प्रचार सभेत त्यांनी सत्ता आल्यास तीन महिन्यात 50 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. वाईट मार्गाने पैसा कमवल्यास ईडी लागते त्यामुळे राजकारण करा पण वाईट मार्गाने पैसा कमवू नका, अशी कोपरखळीदेखील त्यांनी कुणाचे नाव न घेता मारली.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटी पढाओ बेटी बचाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परीवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार विरेंद्र भोईटे, दूध संघाचे बोडवडचे संचालक मधुकर राणे, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजप तालुकाधक्ष प्रफुल्ल जवरे, शिवसेना जिल्हा संघटक अफसर खान यांच्या सह भाजप बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.


