यावल तालुक्यातील शेतकर्याच्या केळीला बाजारभावापेक्षा मिळाला दुप्पट भाव
यावल : तालुक्यातील वड्री येथील एका शेतकर्याच्या पिलबागेच्या केळीला उच्चांकी भाव मिळाला आहे. दर्जेदार केळी पिकवल्याने सद्या सुरू असलेल्या बाजार भावापेक्षा तब्बल एक हजारांचा जास्त भाव त्यांना मिळाला आहे. सध्या एक हजार 200 रुपयांचा भाव असलातरी शेतकर्याच्या केळीला मात्र दोन हजार 200 रुपये भाव मिळाला.
केळी जम्मू-कश्मीरला रवाना
वड्री, ता.यावल येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा शेतकरी धनंजय शेनू पाचपोळे हे गेल्या ती वर्षांपासून दर्जेदार केळी पिकवत केळीला उच्चांक भाव मिळवत आहे. उत्कृष्ठ दर्जाची केळी उत्पादन घेऊन यावर्षीही त्यांनी चांगला भाव मिळवला तसेच त्यांनी यंदा आपल्या शेतातील केळीचे पिलबागमध्ये देखील दर्जेदार उत्पादन तयार केली व त्यांच्या या पिलबागच्या केळीला विक्रमी भाव मिळाला. तीन टप्प्यात केळी कापणी झाली व शेवटचा टप्पा त्यांनी बुधवारी दिला. यात रावेर येथील केळी व्यापारी सुनीता केला सप्लायर यांनी सध्या बाजारात सुरू असलेल्या एक हजार 200 रुपये भावापेक्षा दुप्पट भाव दोन हजार 200 रुपयाने केळी खरेदी केली. ही केळी जम्मू आणि काश्मीर येथे पाठवण्यात आली आहे.


तीन टप्प्यात असा मिळाला भाव
पिलबागास पहिल्या टप्प्यात एक हजार 350, दुसर्या टप्प्यात एक हजार 900 रुपये तर बुधवारी तिसर्या टप्प्यात दोन हजार 200 रुपयांचा भाव मिळाला. हा पिल बागेचा सर्वात विक्रमी भाव मानला जात आहे. दरम्यान, मालामध्ये चिलींग नसल्याने त्या मालाला विषेश मागणी असल्याने भाव मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे व्यापारी टन काट्यावर ऑनलाईन पैसे देत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
