वीज मीटरमध्ये फेरफार करणारे ग्राहक रडावर : सावद्यात 55 मीटर जप्त

वीज गळती रोखण्यासाठी महावितरण कंपनीची धडक कारवाई


Consumers who tamper with electricity meters cry: 55 meters confiscated in Sawada सावदा : सावदा शहर व ग्रामीण भागात वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणार्‍यांविरुद्ध सावदा उपविभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवडेभरात अशा 55 ग्राहकांची वीज जोडणी कापून मीटर जप्त करण्यात आल्याने वीज चोरी करणार्‍या ग्राहकांच्या गोटात प्रचंड खळबळ आहे. वीज चोरांविरुद्ध विविध कलमानव्ये दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कारवाई केलेल्या ग्राहकांमध्ये चिनावलच्या सहा, दसनूर पाच, आंदलवाडी चार, खिरोदा नऊ, कोचूर दोन, मस्कावद चार, निंभोरा 11, सावदा व उदळीच्या सात ग्राहकांचा समावेश आहे.

वीज गळती रोखण्यावर भर
मुख्य कार्यालयाने राबवलेल्या धोरणानुसार ज्या-ज्या वीज वाहिनीवर जास्त विजेची हानी होत आहे अशा ठिकाणी महावितरणच्या वतीने कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून वीज चोरट्यांविरोधात मोहिम उघडण्यात आली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने 0 ते 50 युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या एकूण 285 ग्राहकांच्या मिटरची कसून तपासणी करण्यात आली. त्यात फेरफार करण्यात आलेले 55 मीटर जप्त करण्यात आले व सदरील ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात आली. घरगुती, व्यावसायीक, औद्योगिक व सर्व प्रकारच्या वर्गवारीतील नागरीकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये, अन्यथा संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होईल, असे उप कार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांनी कळवले आहे.



नियमित कारवाई सुरूच राहणार
विद्युत कायद्यानुसार शेजार्‍याकडून अनधिकृतपणे वीज घेणे, मंजूर भारपेक्षा अधिक क्षमतेचा भार वापरणे, मंजूर वर्गवारीतून दुसर्‍या वर्गवारीसाठी अनधिकृतपणे विजेचा वापर करणे, मीटरमध्ये छेडछाड करणे, आकोडे टाकून वीज घेणे, सर्विस वायर बायपास करणे असे प्रकार आढळल्यास कारवाई केली जाते. कुठेही विजेचा अनधिकृतपणे वापर किंवा चोरी होत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांनी दिले आहेत. दरम्यान, वीज चोरट्यांविरोधात सहाय्यक अभियंता विशाल किनगे, योजना चौधरी, हेमंत चौधरी, योगेश चौधरी, सागर डोळे, मंगेश यादव , सचिन गुळवे, प्रसन्न साळुंखे, भूषण पाटील आदींच्या पथकाने कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !