मित्राच्या हळदीवरून परतणार्या तरुणाचा अपघाती मृत्यू
धरणगाव : तालुक्यातील अनोरे येथून मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या तरुणाचा जांभोरा गावाजवळ दुचाकी अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जयवंत गोरख पाटील (28, रा.मंगरूळ, ता. पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
परतीच्या प्रवासात गाठले मृत्यूने
शाम भास्कर पाटील (40, रा.मंगरूळ, ता.पारोळा) व जयवंत गोरख पाटील (28, रा.मंगरूळ, ता.पारोळा) हे दुचाकी (एम.एच.19 डी.डब्ल्यू.5787) ने शनिवार, 17 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास मित्र किरण भास्कर रोकडे (रा.धानोरे, ता.धरणगाव) यांच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने शाम पाटील याच्या ताब्यातील मोटर सायकलचा वेग नियंत्रित न झाल्याने दुचाकी घसरली.


उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
यात दुचाकीवर मागे बसलेला जयवंत पाटील हा पुलाच्या कठड्यावर जोरात पडल्याने त्याच्या डोक्यास, चेहर्यास व पायाला जबर मार लागला. त्यास तात्काळ 108 रुग्णवाहिकेने उपचारासाठी कुटीर रुग्णालय पारोळा येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक उपचार करून धुळे येथे रवाना केले. 108 रुग्नवाहिकेमधील डॉक्टरांनी वाटेत तपासून जयवंतला मृत घोषीत केले. या अपघात शाम पाटील देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, सुनील पांडुरंग पाटील (रा. ओम नगर, चोपडा) यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक शाम पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार खुशाल पाटील करीत आहेत.