सकल जैन समाजाच्या मोर्चाने दणाणले भुसावळ शहर
तीर्थस्थळ श्री पारसनाथ पर्वतराज, सम्मेद शिखरजीचा पर्यटनस्थळाचा दर्जा रद्दची मागणी : भुसावळातील सकल जैन बांधवांनी मोर्चाद्वारे वेधले लक्ष
Bhusawal city was rocked by the march of Sakal Jain Samaj भुसावळ : जगातील सर्वात पवित्र असलेले जैन धर्मांचे तीर्थस्थळ सिद्ध क्षेत्र श्री पारसनाथ पर्वतराज, सम्मेद शिखरजी, मधुबन, जि.गिरडह (झारखंड) हे धर्मस्थळ असताना पर्यावरण मंत्रालयाने स्थळाला पर्यटनस्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ शहरातील सकल जैन बांधवांनी गांधी चौक ते तहसील कार्यालयादरम्यान बुधवारी पायी मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. शासनाच्या निर्णयाविरोधात प्रचंड घोषणाबाजी प्रसंगी करण्यात आली. तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले.
घोषणांनी दणाणले शहर
पर्यटन मंत्रालय आणि झारखंड सरकारकडून श्री संमेद शिखरजी तीर्थक्षेत्र या ठिकाणी इको टुरीझम, लघूउद्योग, मांस उद्योग, मत्स्य पालन, मुर्गी पालन, भूजलचे औद्योगिक निष्कर्षन, हॉटेल व रीसॉटची परवानगी, कमर्शियल कन्स्ट्रक्शन आणि इतर बरेच काही गतिविधिच्या हालचाली सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने जैन धर्मांचे तीर्थस्थळ असलेल्या सिद्ध क्षेत्र श्री पारसनाथ पर्वतराज, सम्मेद शिखरजीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या निषेधार्थ शहरातील गांधी चौकापासून बुधवारी दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरूवात करण्यात आली. अप्सरा चौक, सराफा बाजार, नृसिंह चौक, जामनेर रोडमार्गे मोर्चेकरी तहसील कार्यालयावर धडकले. यावेळी तहसील प्रशासनाला पर्यटनस्थळाचा दर्जा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.


अत्यंत चुकीचा निर्णय
धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यामुळे जगातील जैन समाजामध्ये व धर्म प्रेमींमध्ये तसेच स्थानिक नागरीकांमध्ये आक्रोश पसरला आहे. सर्वधर्म प्रेमी या ठिकाणी दर्शन घेताना तीर्थक्षेत्राचे पावित्र्य लक्षात घेऊन नग्न पायाने पूर्ण पर्वतराजची परीक्रमा-वंदना करतात तसेच अन्न-जल त्याग करून दर्शन घेतात, पूजा प्रार्थना करतात मात्र पर्यटनस्थळाच्या दर्जामुळे या धर्मस्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार आहे. महामहीम राष्ट्रपतींनी केंद्र सरकार व झारखंड सरकारला योग्य निर्णय व संशोधन करण्या करीता आदेश द्यावेत, अशी मागणी प्रसंगी सकल जैन समाजबांधवांनी निवेदनाद्वारे केली.
यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात सकल जैन समाजाचे अध्यक्ष पवनकुमार प्रकाशचंद चोरडीया, उपाध्यक्ष अशोक अमरचंद डोसी, वसंत पुरूषोत्तम चतुर, रमेश अन्नदाते, व्यापारी जयंतीलाल सुराणा, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, सुगनचंद सुराणा, गौतम चोरडीया, कांती चोरडीया, बाळू सुराणा, संदीप देवडा, रवी निमाणी, चेतन जैन, जे.बी.कोटेचा, डॉ.संदीप जैन, पप्पू नाहार यांच्यासह जैन समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.