विधानपरीषदेत पूरनाड टोलनाक्यासह जळगावातील रस्त्यांबाबत तारांकीत प्रश्न
माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी मांडला तारांकित प्रश्न : मुख्यमंत्री म्हणाले रस्त्यांची होणार पुर्नबांधणी
Starred questions regarding roads in Jalgaon including Purnad toll booth in Vidhan Parishad मुक्ताईनगर : विधानपरीषदेच्या हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री तथा विधानपरीषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी जळगाव महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची झालेली दुरवस्था व मुक्ताईनगर मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील चेक पोस्ट नाक्यावर होत असलेल्या गैरव्यवहाराविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उत्तर देताना रस्त्यांची कामे केली जाणार असल्याचे सांगत पूरनाड नाक्यावरील दोषींवर कारवाईबाबत जळगाव एसीबीला परीवहन आयुक्तांनी पत्र दिल्याची माहिती दिली.
जळगावातील रस्त्यांचा प्रश्न विधानसभेत
जळगाव महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेविषयी एकनाथराव खडसे यांनी विधानपरीषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षात किती निधी मंजूर करण्यात आला व किती खर्च करण्यात आला तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली याबाबत प्रश्न उपस्थित केला तसेच खराब रस्त्यांमुळे जळगावात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना सांगितले जळगाव महानगरपालिका क्षेत्रात अमृत योजना व भुयारी गटार योजने अंतर्गत कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या पुनर्बांधणी साठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या 100 कोटींच्या प्रस्तावास 16 ऑगस्ट 2018 अन्वये तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 22 मार्च 2022 अन्वये शहरातील 49 रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी 39 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली असून ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. यापैकी शासनाकडून 8.93 कोटी व महानगरपालिका हीश्यातील 5.10कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आले आहेत. ज्या रस्त्यावरील पाणीपुरवठा व मल्लनिसारण योजनेंतर्गत ची कामे पूर्ण झाली आहेत त्या रस्त्यांची पुनर्बांधणीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत सुरू करण्यात आलल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पूरनाड नाक्याबाबत जळगाव एसीबीला पत्र
महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर परिवहन विभागाच्या अधिकारी ट्रक चालकांकडून लाच स्वीकारतात तसेच वजन मापात फेरफार करून ट्रक चालकांकडून अवैध मार्गाने पैसे गोळा करीत असल्याने या अधिकार्यांवर काय कारवाई करण्यात आली याबाबत एकनाथराव खडसे यांनी विधानपरीषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले. ते म्हणाले की, सीमा तपासणी नाका पूर्णाड, जि.जळगाव येथे नेमलेल्या खाजगी कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याबाबत तसेच सीमा तपासणी नाका पूर्णाड येथे कार्यरत असणार्या वजन काट्यांचे कॅलिब्रेशन करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे तसेच याप्रकरणी उचित कार्यवाही करण्याबाबत उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांना परीवहन आयुक्त कार्यालयाकडून पत्राद्वारे कळविण्यात आले आहे तसेच सीमा तपासणी नाक्यावरील वजन काट्यांची तपासणी आठवड्यात एकदा करण्यात यावी याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाना कळविण्यात आले आहे.