खडसेजी आधी आपल्या जावयाला सोडवा : मंत्री गुलाबराव पाटील बरसले
Khadseji first release your son-in-law : Minister Gulabrao Patil Barasle जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंचा समाचार घेत त्यांच्यावर टिकेचे बाण चालवले आहेत. भोसरी प्रकरण कोणी केलं, आपण काय संत आहात का? असे म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधत आधी जावयाला सोडवण्याचा सल्ला दिला आहे.
मगच करावेत मुख्यमंत्र्यांवर आरोप
मंत्री पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पहिले आपल्या जावयाला सोडवा. ते कोणत्या कारणावरून जेलमध्ये आहेत, त्यांना बाहेर काढा. ते साधुसंत आहेत म्हणून जेलमध्ये आहेत का? कृपा करून त्यांनी आधी जावयाला बाहेर काढावे आणि मग एकनाथ शिंदेंवर आरोप करावा, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला.

राज्यपालांवर बोलणारे आम्हीच
शिंदे गटाच्या चाळीस आमदारांचं टायटॅनिक जहाज बुडेल, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केली आहे. कुणी खोके, म्हणा कुणी जहाज म्हणा… मात्र आमच्या एकनाथ शिंदे यांची गाडी सुसाट भाग रही है, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आनंद परांजपे यांना जोरदार उत्तर दिले आहे. राज्यपाल यांनी जे वक्तव्य केले आहे ते चुकीचे वक्तव्य आहे. त्या वक्तव्याला मी मान्यता दिलेली नाही. राज्यपाल यांच्यावर बोलणारे सर्वात पहिले आम्ही होतो, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना इशारा
फार नैतिकतेच्या गप्पा करू नका , आपण जमिनीत किती खोल आहोत याचा विचार करा.. तुमचे जावई २२ महिन्यांपासून जेलमध्ये आहेत, त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही आणि मंदा खडसे या सुद्धा नो कोर्सिव अॅक्शन, न्यायालयाने सांगितलेला आहे म्हणून बाहेर आहेत. चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आपण करू नका, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला आहे. आपण काय केले आहे हे सर्वांना माहित आहे. एसीबीची चौकशी सुरू आहे, लवकरच चार आठ दिवसांत त्याचा रीपोर्ट येईल. मग बोला. खोटे बोल पण नेटाने बोल, असा प्रकार खडसे यांच्याकडून सुरू असल्याचेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
तो पर्यंत मुख्यमंत्र्यांनी द्यावा राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे केलं ती अनियमितताच असून तो भ्रष्टाचारच आहे व त्यांनी राजीनामा द्यावाच. माझ्यावर भूखंड गैरव्यवहाराचे आरोप झाले. मात्र त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नव्हता. तरीसुद्धा मला नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असे भाग पाडण्यात आले. मी राजीनामा दिला. त्यामुळे चौकशीतून जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. जर ते निर्दोष सुटले तर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे एकनाथ खडसे म्हणाले होते.