भुसावळात रविवारी रंगणार कालिदास काव्य महोत्सव
जय गणेश फाउंडेशनचा उपक्रम : शहरातील 12 कवी प्रथमच एका व्यासपीठावर
भुसावळ : शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे स्व.कालिदास विठोबा नेमाडे यांच्या स्मरणार्थ बहुभाषिक कालिदास काव्यमहोत्सव यंदा आयोजित केला आहे. रींग रोडवरील संतोषी माता हॉलमध्ये रविवार, 26 मार्च सायंकाळी पाच वाजता हा महोत्सव सुरू होईल.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी समीक्षा पुरस्कार’ जाहीर झालेले डॉ.मधू खराटे असतील. निमंत्रित कवींमध्ये प्रा. डॉ.जे.पी.सुचिक, हामीद भुसावली, हरीषकुमार नागदेव, प्रा.डॉ.रघुनाथ कश्यप, प्रा.डॉ.सुधा खराटे, रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त आयुक्त रमेश सरकाटे, प्रा.डॉ.सुरेश कुसुंबीवाल, हारुन उस्मानी, सीमा भारंबे, जयश्री काळवीट, संध्या भोळे अशा 12 जणांचा समावेश आहे. निवेदकाची भूमिका संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गिरीश कुळकर्णी हे पार पाडतील.
यांची राहणार प्रमुख उपस्थिती
विशेष अतिथी म्हणून माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथ खडसे, भुसावळ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, हेडा ग्रुपचे संचालक मधुकर हेडा यांची उपस्थिती राहील, असे जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, फाउंडेशनचे अध्यक्ष चैत्राम पवार, समन्वयक गणेश फेगडे यांनी सांगितले. आयोजन व नियोजन समितीच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन त्यात कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करून विविध उपसमित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत.
कवितेचा फुलणार मळा
गावशिवच्या कवींना एकत्रित भेटून त्यांच्या कवितांचा लाभ घेता यावा, सांस्कृतिक चळवळीला ऊर्जा मिळावी, कवितेची गोडी लागावी या उद्देशाने या काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील बहुभाषिक 12 कवी प्रथमच या महोत्सवात एकाच व्यासपीठावर येत असून भुसावळकरांनी ही मोठी सांस्कृतिक मेजवानी आहे, असे फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले.