जळगावातील पाच वर्षीय बालिकेच्या विजेच्या धक्क्याने मृत्यू


A five-year-old girl died of electric shock in Jalgaon जळगाव : अवकाळी पावसामुळे विद्युत तारांमध्ये प्रवाह उतरल्यानंतर त्याचा धक्का लागल्याने जळगावच्या निमखेडीतील पाच वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवार, 20 रोजी सकाळी घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धनवी महेंद्र बाविस्कर (5, निमखेडी शिवार, दत्त मंदीराजवळ, जळगाव) असे मयत चिमुकलीचे नाव आहे.

खेळताना लागला विजेचा धक्का
जळगाव शहरातील निमखेडी भागात धनवी ही सोमवारी गल्लीतील लहान मुलांसोबत गल्लीत खेळत असताना लोंबकलेल्या एका विद्युत तारेला चिमुकलीचा स्पर्श होताच तिला विजेचा जोरदार धक्का लागला. या अपघातात ती गंभीर जखमी झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन महाजन यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. हे ऐकताच आई-वडीलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मयत चिमुकलीचे वडील महेंद्र छगन बाविस्कर हे हातमजुरीचे काम करतात तर घरी आई, आजी आणि एक बहिण असा परीवार आहे. या दुदैवी घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


कॉपी करू नका.