पारोळ्यात भीषण अपघात : कंकराजचे दोघे हार्वेस्टर मशीनच्या धडकेने ठार
Horrific accident in Parola : Two from Kankaraj killed after being hit by a harvester machine पारोळा : भरधाव हार्वेस्टर मशीनने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोघे ठार झाले. हा अपघात भोकरबारी फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता घडला. या अपघातात संतोष बाबूराव पाटील (60) व अविनाश देविदास पवार (36, दोन्ही रा.कंकराज, ता.पारोळा) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हार्वेस्टर मशीनवरील चालकाविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भरधाव मशिनच्या धडकेने अपघात
संतोष पाटील व अविनाश पवार हे गुरुवारी सायंकाळी शेतीचे साहित्य घेऊन दुचाकी (एम.एच.19 डी.डी.2591) ने पारोळ्याकडून कंकराजकडे निघाले असताना रर्स्त्यात भोकरबारी धरणाजवळ समोरून आलेल्या हार्वेस्टर (पी.बी.05 एम.1263) ने दुचाकीला धडक दिली. यात दोघे जबर जखमी झाल्यानंतर त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले असता संतोष पाटील यांना मृत घोषित करण्यात आले तर अविनाश यास पुढील उपचारासाठी धुळ्याकडे नेत रस्त्यात त्यांचा मृत्यू ओढवला. संतोष पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा, तर अविनाश पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण व मुले, असा परिवार आहे. अपघात प्रकरणी राजाराम आप्पा पाटील (65, कंकराज) यांच्या फिर्यादीवरून हार्वेस्टर चालकाविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.
