अमळनेरात पिस्टलाच्या धाकावर पेट्रोल पंप लुटला

आरोपी सीसीटीव्हीत कैद : 36 हजारांची रोकड लांबवली


A petrol pump was robbed at gunpoint in Amalner अमळनेर : सिनेस्टाईल आलेल्या आरोपीने पिस्टलाच्या धाकावर पेट्रोल पंप लुटल्याची घटना शहराजवळीलडांगर शिवारातील पेट्रोलपंपावर गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून या घटनेत 36 हजारांची रोकड लांबवण्यात आली आहे. आरोपींचा पोलिस यंत्रणेने कसून शोध सुरू केला आहे.

झोपेतून उठवून केली लूट
डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या रुमालाने चेहरा बांधलेल्या तरुणाने पंपावरील कर्मचार्‍यांना झोपेतून उठवत त्यांना स्वतःकडील बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले. त्याचवेळी एक जण चारचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला असता त्याच्या डिक्कीला लाथा मारून चालकास बाहेर निघण्यास भाग पाडण्यात आले व त्याला बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली व त्याच्याकडील पाकिट हिसकावून लुटारू अमळनेर रस्त्याकडे पसार झाला व त्यानंतर दोघे दुचाकीद्वारे धुळ्याकडे पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
पेट्रोलपंपावरील कर्मचारी नरेंद्र सोनसिंग पवार याच्याकडून 13 हजार, किशोर रवींद्र पाटील याच्याकडून 14 हजार व डिझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय दिलीप भामरे याच्याकडून नऊ हजार रुपये असा एकूण 36 हजार 500 रुपये या चोरट्याने हिसकावून नेले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली. तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली असून नरेंद्र सोनसिंग पवार (रा. रणाइचे, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !