जळगाव शहरात गँगरीननं बालकाचा मृत्यू : पाथरीतील तिघा डॉक्टरांविरोधात गुन्हा


Child’s death due to gangrene in Jalgaon city: Crime against three doctors from Pathri जळगाव : ताप आल्यानंतर चार दिवसात कमरेवर चार वेळा व नंतर एका वेळा हातावर इंजेक्शन दिल्यानंतर सेप्टीक झालेल्या 11 वर्षीय बालकाला नंतर गँगरीन झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी दीड वर्षांनी गुरुवारी बालकाच्या आईच्या फिर्यादीवरुन पाथरी गावातीलच तिन्ही डॉक्टरांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने डॉक्टरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दुर्वेश नाना पाथरवट (11) असे मयत बालकाचे नाव आहे.

गावातील तिघा डॉक्टरांविरोधात गुन्हा
धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील दुर्वेश पाथरवट हा पाथरी येथे आईसोबत मामाच्या गावी राहत होता. 10 ऑक्टोबर 2021 रोजी दुर्वेशला ताप आल्याने कुटुंबियांनी त्यास पाथरी गावातीलच डॉ.स्वप्निल युवराज पाटील यांच्या दवाखान्यात नेल्याने त्यांनी तपासून दुर्वेश यास कमरेवर एक इंजेक्शन व काही गोळ्या लिहून दिल्या. यानंतर तीन दिवसांनी पुन्हा दुर्वेश यास ताप आल्याने कुटुंबियांनी त्याला डॉ.स्वप्निल पाटील यांच्या दवाखान्यात नेले. याठिकाणी डॉ.स्वप्निल पाटील नव्हते तर डॉ.युवराज जयराम पाटील यांनी दुर्वेश यांच्या दोन्ही कमरेवर इंजेक्शन व गोळ्या लिहून दिल्या होत्या.

हाताच्या दंडावर दिले इंजेक्शन
14 ऑक्टोबरला दुर्वेशच्या कमरेवर इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी त्रास व्हायला लागल्याने कुटुंबियांनी दुर्वेश यास गावातील डॉ.सुभाष जाधव यांच्याकडे नेले. त्यांनी दुर्वेशला त्याच्या कमरेवर व हाताच्या दंडावर इंजेक्शन दिले व पुन्हा काही गोळ्या लिहून दिल्या. दुर्वेशला कमरेवर इंजेक्शन घेतल्याच्या ठिकाणी त्रास होत असल्याने दुर्वेशच्या मामाने डॉ.युवराज पाटील यांना फोनवरुन सांगितले. यानंतर डॉ.युवराज पाटील घरी आले. त्यांनी दुर्वेशला तपासले तसेच दवाखान्यात घेऊन येण्याचे सांगितल्याने तसेच डॉ.स्वप्नील पाटील हे तपासून नेमकं काय झालं ते सांगतील ? असे युवराज पाटील यांनी दुर्वेशच्या कुटुंबियांना सांगितलं. दुर्वेशला दवाखान्यात नेले असता डॉ.स्वप्निल पाटील यांनी दुर्वेश यास तपासून इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी सेप्टिक झाले असावे, असे सांगत त्यास पुढील उपचारासाठी जळगावातील पियुश हॉस्पिटल येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. डॉ.स्वप्निल पाटील यांच्या सांगण्यानुसार कुटुंबियांनी 15 ऑक्टोंबर रोजी दुर्वेश यास उपचारासाठी जळगावात पियुश हॉस्पिटल येथे नेले. याठिकाणच्या डॉक्टरांनी दुर्वेश यास तपासले व सोनोग्राफी करण्यास सांगितले.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
सोनोग्राफीनंतर दुर्वेश यास कमरेपासून मांडीपर्यंत गँगरीन झाले असून त्याची शस्त्रक्रिया करावी लागेल असे पियुष हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी सांगितले व दुर्वेशच्या कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला. पियुश हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेपूर्वी रक्ताचे सॅम्पल घेत असताना दुर्वेशची हालचाल अचानक थांबली. दुर्वेशला जिल्हा रुग्णालयात नेले असता येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दुर्वेश यास तपासून मयत घोषित केले. याबाबत सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर आता गुरुवार, 23 मार्चला दुर्वेश याची आई प्रतिभा नाना पाथरवट यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार डॉ. स्वप्नील युवराज पाटील, युवराज गंगाराम उर्फ जयराम पाटील आणि डॉ.सुभाष जाधव यांच्याविरोधात निष्काळजीपणामुळे मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करत आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या अभिप्रायात दुर्वेश यास इंजेक्शन देणारे पाथरी गावातील डॉ.स्वप्नील युवराज पाटील, युवराज गंगाराम ऊर्फ जयराम पाटील व डॉ.सुभाष जाधव यांना इंजेक्शन देण्याची परवानगी नसतानाही त्यांनी दुर्वेश यास कमरेवरती इंजेक्शन दिले आणि या इंजेक्शनमुळे दुर्वेश यास गँगरीन होवून त्याचा मृत्यू झाला, असे नमूद केले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !