भुसावळातील बंटी पथरोडसह पाच जणांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार
जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश : भुसावळातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ
Bunty Pathroad in Bhusawal along with a gang of five deported from the district भुसावळ : भुसावळातील पोलिसांच्या दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या बंटी पथरोडसह पाच जणांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काळात आणखी काहींवर कारवाई होणार असल्याची दाट शक्यता आहे. हद्दपार झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख बंटी परशूराम पथरोड (33, वाल्मीकनगर, भुसावळ), विष्णू परशुराम पथरोड (29, वाल्मीकनगर, भुसावळ), शिव परशुराम पथरोड (26, वाल्मीकनगर, भुसावळ), रवींद्र उर्फ माया माधव तायडे (24, वाल्मीक नगर, भुसावळ), हर्षल सुनील पाटील (24, वाल्मीकनगर, भुसावळ) यांचा समावेश आहे.
गुन्हेगारी टोळीविरोधात 24 गुन्हे
बंटी पथरोडसह टोळी विरोधात भुसावळ शहर, बाजारपेठ व लोहमार्ग पोलिसात तब्बल 24 गुन्हे दाखल आहेत. त्यात जबरी चोरी, लूट, शरीराविरोधात आघात, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे यासह गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. संशयितांविरोधात हद्दपारीची कारवाई करण्याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे प्रस्तावाची छाननी करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे अंतीम प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी कलम 55 अधिकाराचा वापर करून पथरोड टोळीला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार मंगळवारी हद्दपार केले. याबाबतची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली.
