अपघात सत्र कायम : जळगावात पुन्हा कंटेनरच्या धडकेने वकिलांचा मृत्यू


Accident session continues : Lawyer dies after being hit by a container again in Jalgaon जळगाव : शहरात अपघातांचे सत्र कायम असून पुन्हा एका वकिलाचा कंटेनरच्या धडकेने मृत्यू झाल्याची संतापजनक घटना सोमवार, 27 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास नेहरू चौकात घडली. या अपघातात अ‍ॅड.योगेश जालमसिंग पाटील (45, दादावाडी, जळगाव) यांचा मृत्यू झाला. धडक देणार्‍या कंटेनरसह चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पक्षकाराकडे जाताना गाठले मृत्यूने
मूळचे चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील अ‍ॅड.योगेश पाटील हे सद्या दादावाडी परीसरात वास्तव्यास होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते जिल्हा न्यायालयात वकीली करत होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते त्यांच्या ऑफिसमधील सहकार्यांना रेल्वे स्थानक परीसरात असलेल्या पक्षकाराकडे कागदपत्रे घेण्यासाठी जात असल्याचे सांगून दुचाकी (एम.एच.19 सी.ई.6511) ने बाहेर पडले. नेहरू चौकातून ते रेल्वे स्थानकाकडे जात असताना टॉवर चौकाकडे जाणार्‍या (एम.एच.19 सी.वाय. 2231) क्रमांकाच्या कंटेनरने योगेश पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात पाटील यांच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरीकांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. अपघातात योगेश पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच न्यायालयातील त्यांच्या सहकार्‍यांनी व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !