सुरत-जळगाव मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना धमकावून लूट
In Surat-Jalgaon railway trains, passengers were looted by third parties by threatening them भुसावळ : सुरत-जळगाव मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांकडून रेल्वे प्रवाशांना धमकावून लूट होत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारवाईची जवाबदारी असलेली सुरक्षा यंत्रणा आर्थिक-देवाण घेवाणीमुळे मूग गिळून गप्प असल्याचा उघड आरोप प्रवासीवर्गातून होत आहे. विशेष म्हणजे लूट करणारे तृतीयपंथी ‘असली की नकली’ हा एक संशोधनाचा भाग असून प्रवाशांच्या खिशात हात घालून लूट केली जात असल्याने संबंधितांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुज्ञ प्रवासी करीत आहेत. नंदुरबार ते जळगाव दरम्यान हे प्रकार ताप्ती गंगा, अमरावती एक्स्प्रेससह सुरत पॅॅसेंजरमध्ये दररोज घडत आहेत.
हा तर जबरी लुटीचा प्रकार
परीस्थितीमुळे कुणी लाचार झाल्यानंतर भीक मागत असल्यास प्रवासीदेखील माणुसकीच्या भावनेने दोन ते पाच रुपयांची मदत निश्चित करतात मात्र रेल्वे गाड्यांमध्ये दोन ते पाच संख्येने शिरणारे तृतीयपंथी थेट प्रवाशांना धमकावत असून त्यांनी पैसे न दिल्यास त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढत आहेत त्यामुळे हा प्रकार दरोड्यात मोडत असल्याने त्यांच्या विरोधात जबरी लूट प्रकरणी गुन्हा दाखल करावा तसेच दोषींवर कारवाई न करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सुज्ञ प्रवासी व्यक्त करीत आहेत. ज्या प्रवाशांनी पैसे देण्यास नकार दिल्यास त्यांच्याशी अश्लील भाषेत वर्तन केले जात असून परीवारासमोरच प्रवाशांच्या पँटला हात लावणे तसेच पुरूष मनाला लज्जा निर्माण होईल, असे वर्तनही या तृतीयपंथीयांकडून केले जात आहे.
सुरक्षा यंत्रणा हप्तेखोरीमुळे ‘लाचार’
नंदुरबार ते जळगाव दरम्यानच्या स्थानकावर दोन ते पाच संख्येने असलेले तृतीयपंथी जनरल, स्लीपर डब्यात अचानक शिरतात व प्रवासी झोपला असलातरी त्याला मारून उठवत प्रत्येक दहा ते वीस रुपये बळजबरीने मागतात व पैसे न देणार्याच्या सरळ खिशात हात घालून वेळ-प्रसंगी रक्कमही काढून घेतात. नंदुरबार स्थानकावर लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय आहे तर नंदुरबार-जळगावदरम्यानच्या दोंडाईचा, अमळनेरसह जळगावदरम्यान सुरक्षा बलासह लोहमार्ग यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत मात्र हप्तेखोरीमुळे या यंत्रणांचा आत्माच मेल्याचा उघड आरोप प्रवासी आता करू लागले आहेत.
अनधिकृत विक्रेत्यांकडून गुटखा, सिगारेटसह सर्वच उपलब्ध
रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत विक्रेत्यांचा सर्वाधिक बोलबाला आहे. वास्तविक अनधिकृत विक्रेत्यांना चाप लावण्याची रेल्वे सुरक्षा यंत्रणेसह लोहमार्ग पोलिसांची नैतीक जवाबदारी आहे मात्र दररोज या अनधिकृत विक्रेत्यांकडून हप्ते यंत्रणांना मिळत असल्याने कारवाई करण्यास यंत्रणा धजावत नसल्याचा आरोप आहे. अत्यंत सुमार दर्जाच्या तेलात तळलेले पदार्थ तसेच पाच ते सात रुपयात बाजारात मिळणारी पाण्याची बाटली 20 रुपयात विक्री केली जात असून प्रवाशांची मोठी लूट केली जात आहे शिवाय गुटखा, सिगारेट तर बिनदिक्कत प्रवाशांना उपलब्ध करून दिली जात आहे. सिगारेटच्या आगीमुळे रेल्वे गाड्यांमध्ये आग लागून काही अप्रिय घटना घडल्यास जवाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अधिकार्यांना सुचना करणार : रेल्वे सुरक्षा आयुक्त
जळगाव रेल्वे स्थानकावर आऊटरवर एका कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली असून कारवाईचे निर्देश सुरक्षा बलाच्या अधिकार्यांना देण्यात येतील तसेच वेस्टर्न लाईनच्या अधिकार्यांशी देखील घडलेला प्रकार सांगून निश्चित उपाययोजना करण्यात येतील, असे रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त एच.श्रीनिवासराव यांनी सांगितले.


