भुसावळ ग्रामीणमध्ये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

20 कोटींच्या योजनेतून नागरीकांची भागणार तहान : तीन जलकुंभाची उभारणी


Bhumi Poojan of Water Supply Scheme in Bhusawal Rural भुसावळ  : शहराला लागून असलेल्या मात्र नगरपालिका व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात न येणार्‍या भुसावळ ग्रामीण वसाहतीसाठी आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून 20 कोटी रुपयांची योजना मंजूर झाली होती. या योजनेच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. योजनेमुळे नागरीकांचे पाण्यासाठी होणारे हाल लवकरच थांबणार आहेत.

नागरीकांना मोठा दिलासा
शहरालगत असलेला भुसावळ नगरपरीषदेच्या हद्दीत येत नसलेल्या व ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतही येत नसलेल्या भागात गेल्या अनेक वर्षापांसून पाण्याची समस्या भेडसावत होती. त्यासाठी आमदारांच्या पाठपुराव्यातून भुसावळ ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. सुमारे 20 कोटी रुपयांच्या या योजनेतून नगरपरीषद हद्दीबाहेरील व ग्रामपंचायतीच्या बाहेरील वस्ती असलेल्या पूजा कॉम्लेक्स परीसर, पांडुरंगनाथ नगर, आर.एम.एस.कॉलनी, गुलमोहर प्रेस्टीज फेज चार, घोडेपीर बाबा जवळील कॉलनी आदी भुसावळ ग्रामीण भागात पाणीपुरवठा होणार आहे. या भागांना पाणीपुरवठ्यासाठी पिंप्रीसेकम गावाकडील नदीमध्ये जॅकवेल ब्रीज व पंप हाऊस उभारण्यात येऊन अशुद्ध व शुद्ध पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येऊन ते पाणी तीन जलकुंभात आणून या भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

भूमिपूजनप्रसंगी यांची उपस्थिती
पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्यासह उद्योजक मनोज बियाणी, विणोद बियाणी, पियुष बियाणी, गोपाल ठाकूर, रमाकांत महाजन, देवा वाणी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

वर्षभरात होणार पाणीपुरवठा : आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरीकांच्या वस्त्या झाल्यानंतर त्यांना पाणीपुरवठा होत नसल्याची अडचण होते. भुसावळ ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या नागरीकांना एका वर्षाच्या आत पाणीपुरवठा सुरू होणार असून त्यामुळे त्यांचे हाल आता निश्चित थांबतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !