निमखेडी शिवारात पैशांच्या वादातून तरुणाच्या डोक्यात मारला रॉड
In Nimkhedi Shivar, a young man was hit by a rod in the head due to a dispute over money जळगाव : पैशांच्या वादातून एका तरुणाला दोन जणांनी डोक्यात लोखंडी रॉड व कुलूप मारून गंभीर जखमी केल्याची घटना जळगाव शहरातील निमखेडी शिवारात असलेल्या पटेल नगरात घडली. या प्रकरणी गुरुवारी दोघांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
कृष्णवर्धन राजेंद्र पाटील (22, पटेल नगर, निमखेडी शिवार, जळगाव) हा तरुण मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याच परीसरातील राजेंद्र नामदेव सोनवणे आणि दिनेश राजेंद्र सोनवणे यांनी बुधवार, 29 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कृष्णवर्धन यांच्याकडे 50 हजार रुपये मागितले. त्यावर कृष्णवर्धन पाटील म्हणाले की, पैशांबाबत सकाळी बोलू मात्र याचा राग आल्याने दोघांनी कृष्णवर्धन पाटील यांच्या डोक्यात कुलूप व लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत कृष्णवर्धन पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर गुरुवारी कृष्णवर्धन पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेंद्र नामदेव सोनवणे, दिनेश राजेंद्र सोनवणे (दोन्ही पटेलनगर, निमखेडी शिवार, जळगाव) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.
