मोदी सरकारचे पितळ उघडे पाडल्यानेच खासदार राहुल गांधीवर कारवाई : यावलला काँग्रेस पदाधिकार्‍यांचा दावा


यावल : शहरातील शेतकी संघाच्या सभागृहात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून पत्रकार परीषद घेण्यात आली. त्यात काँग्रेसचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आली असून सत्ताधार्‍यांचे पितळ उघडे पडणार म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. या कारवाईचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला.

यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात माजी आमदार रमेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परीषद घेण्यात आली. या पत्रकार परीषदेमध्ये काँग्रेसचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळ्या संदर्भात प्रश्न विचारले, अदानी उद्योग समूहात गुंतलेले वीस हजार कोटी कोणाचे यामध्ये एक चिनी नागरीकाचा सहभाग आहे, तो चिनी नागरिक कोण?, उद्योगपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचा संबंध काय आहे?, असे विविध प्रकारचे प्रश्न विचारून सत्ताधार्‍यांना त्यांनी वेठीस धरले होते. सत्ताधारी याचे उत्तर देऊ न शकल्याने काँग्रेसचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याकरीता त्यांच्यावर सुडबुद्धीने जलद गतीने सुरत कोर्टाचा निकाल देऊन त्यांना दोन वर्षाची शिक्षा देण्यात आली आणि त्यांचे खासदार पद रद्द करण्यात आल्याचे पदाधिकारी म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
प्रसंगी माजी आमदार रमेश चौधरींसह तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, निरीक्षक ज्ञानेश्वर महाजन, इंटक जिल्हा अध्यक्ष भगतसिंह पाटील, माजी सभापती नितीन चौधरी, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, शेतकी संघ चेअरमन अमोल भिरूड, शहराध्यक्ष कदीर खान, पुंडलिक बारी, अनिल जंजाळे, समाधान पाटील, अमर कोळी, शरद राजपूतसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या पत्रकार परीषदेचे सूत्रसंचालन शेखर पाटील यांनी तर आभार शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड यांनी मानले. पत्रकार परीषदेत माजी आमदार रमेश चौधरी, प्रभाकर सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, भगतसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !