मुक्ताईनगरात मोदी सरकारच्या जुमला दिनाचा निषेध
मुक्ताईनगर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा शहरात आंदोलन करून तसेच पत्रकार परीषदेत पदाधिकार्यांनी निषेध केला. मुक्ताईनगर तालुका काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत मोदी सरकारवर सडकून टिका करण्यात आली तसेच 1 एप्रिल हा दिवस जुमला दिवस म्हणून साजरा करण्यात आला. पत्रकार परीषदेला निरीक्षक म्हणून काँग्रेसचे देवेंद्र मराठे उपस्थित होते.
यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एस.ए.भोई, ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, प्रदेश प्रवक्ता अॅड.अरविंद गोसावी, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, सेवा दलाचे अध्यक्ष प्रा.सुभाष पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजू जाधव, आरीफ रब्बानी, यासीन खान, निखील चौधरी, महिला काँग्रेसच्या ज्योती धामोडे, मुक्ताबाई भगत, भावना सोनटक्के, नामदेव कांडेलकर यांच प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परीषदेदरम्यान काँग्रेस पदाधिकार्यांनी मोदी सरकारच्या द्वेषपूर्ण वागणुकीच्या निषेधार्थ आक्रोश व्यक्त केला. 70 वर्ष काँग्रेसने सत्ता असताना भाजपा व त्यांच्या मातृसंस्थेचा द्वेष केला असता तर ते चटणीला देखील पुरले नसते, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

अदानींबाबत प्रश्न विचारताच केली कारवाई
राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारीला संसदेत अदानी घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारले तसेच 20 हजार कोटी रुपये अदानी उद्योग समूहात कोणी गुंतवले? या सेल कंपन्या कुणाच्या? नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांचा संबंध काय? संरक्षण क्षेत्र विमानतळ ऊर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अदानी यांना कशी मदत केली? या प्रश्नांसह अदानीला वाचवण्यासाठीच मोदी सरकार सर्व शक्ती पणाला लावत असून राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा कोणताही अपमान केला नाही, उलट ओबीसी समाजाचे मुख्यमंत्री काँग्रेसचे राहुन चुकलेले आहेत आणि विद्यमान दोन मुख्यमंत्री काँग्रेसचे हे ओबीसी आहेत. सुरत न्यायालयाच्या निकालानंतर केवळ 24 तासात त्यांची खासदारकी रद्द करणे, घर खाली करण्याची नोटीस देणे यासह विविध मुद्यांवर केंद्र सरकार सूडबुद्धीने वागत आहे. अदानी घोटाळ्याची चर्चा होऊ नये म्हणून राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत असून निरव मोदी, ललित मोदी हे ओबीसी समाजाचे नसतानाही त्यांना ओबीसी दाखवून राजकीय वातावरण खराब करण्याचे काम भाजपा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मोदी सरकार चोर दरोडेखोर-घोटाळेबाजांचा परदाबाज करणार्या राहुल गांधी यांना लक्ष करून त्यांच्यावर कारवाई करीत असल्याचे पदाधिकारी म्हणाले.
