भुसावळातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या आवारातून तृतीयपंथीयांनी वृद्धाची लाखाची रोकड लांबवली
The third parties stole the old man’s cash of one lakh from the premises of Bank of Maharashtra in Bhusawal भुसावळ : तालुक्यातील तळवेल येथील 60 वर्षीय वयोवृद्धाने बँक ऑफ महाराष्ट्रमधून कामानिमित्त एक लाखांची रोकड काढल्यानंतर बँकेतून बाहेर पडताना दोन अनोळखी तृतीयपंथीयांनी वयोवृद्धाचे लक्ष विचलित करीत बॅगेतून रोकड लांबवल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वसंत प्रल्हाद लढे (60, तळवेल,ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलिसात दोन अनोळखी तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीवरून तृतीय पंथीयांचा शोध
लढे यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता महाराष्ट्र बँकेत आल्यानंतर एक लाखांची रोकड काढली व सोबत आणलेल्या बॅगेत ठेवली व तीन वाजेच्या सुमारास बँकेच्या गेटमधून बाहेर पडत असताना पाळत ठेवून असलेल्या दोन तृतीयपंथीयांनी बॅगेची चैन उघडत रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लढे यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे कैफियत मांडल्यानतर पोलिसांनी या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल केला.
तृतीय पंथीयांचा कसून शोध
लढे बँकेत आल्यानंतर त्यांच्यावर गुलाबी रंगाची ओढणी, फिकट निळ्या रंगाचा कुर्ता, गुलाबी लॅगीज घातलेल्या व तपकिरी रंगाची साडी नेसलेल्या तृतीयपंथीयांनी नजर ठेवली होती व त्यांनी ही चोरी केल्याचा संशय लढे यांना असल्याने त्यावरून पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत संशयीतांचा शोध सुरू केला आहे. तपास एएसआय सत्तार शेख करीत आहेत.
